Ad will apear here
Next
देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज : उपराष्ट्रपती


पुणे :
‘भारताला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुरातत्त्वशास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पुण्यात केले. 

पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार २६ सप्टेंबर रोजी सकाळी नायडू यांच्या हस्ते ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांना देण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते. एक लाख रुपये, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिमा आणि पुण्याच्या ग्रामदैवतांसह असलेले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा ३१वे वर्ष आहे.

या वेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ के. एच. संचेती, खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. 

भाषणाची सुरुवात मराठीत करून एम. व्यंकय्या नायडू यांनी पुणेकरांची मने जिंकली. पुढे त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत पुणेकरांशी संवाद साधला. नायडू म्हणाले, ‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वांत सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराज, फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरात दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा असून, या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल. चांगले कार्य करणाऱ्यांना गौरवण्याच्या या प्रथेची मी प्रशंसा करतो.’ 

‘या वर्षीचा पुरस्कार पुरातत्त्ववेत्ते डॉ. देगलूरकर यांना दिल्याने पुरातत्त्वशास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्त्वशास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतिस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे हा समृद्ध वारसा जपण्याचे काम सर्व देशवासीयांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी त्यांना देशाच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांवर नेले पाहिजे,’ असे उपराष्ट्रपती म्हणाले.

‘भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असल्याने हा युवा वर्ग आपल्या देशाचे शक्तिस्थान आहे. या युवकांना इतिहासातून प्रेरणा मिळून त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,’ असे नायडू म्हणाले. तसेच आजच्या युवा पिढीने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन ही नायडू यांनी या वेळी केले.



‘इन्फर्मेशन विदाउट कन्फर्मेशन इज अॅम्युनिशन’ असे सांगून त्यांनी मूर्तिशास्त्र, पुरातत्त्व, संस्कृती क्षेत्रातील कामाचे महत्त्व सांगितले. ‘भारत विश्वगुरू आहे. परकीय इतिहास शिवाजी महाराज, बसववेश्वर, राणी लक्ष्मीबाई, रामानुजाचार्य अशांना पुढे आणत नाही. ऐतिहासिक, पुरातत्त्व स्थळे जपण्यात लोकसहभाग वाढला पाहिजे. कंपन्या पुढे आल्या पाहिजेत. सर्व कामे सरकार करू शकत नाही,’ असे उपराष्ट्रपती म्हणाले.

भांडारकर, दांडेकर, देव, ढवळीकर, मते अशा पुणेकरांच्या पुरातत्त्व क्षेत्रातील कामाची नायडू यांनी प्रशंसा केली. ‘आंतरशाखीय अभ्यास इतिहासातील गुपिते शोधून काढण्यात उपयुक्त ठरेल,’ असेही नायडू यांनी सांगितले. ‘इतिहास, परंपरा, संस्कृती जपून आपला पाया बळकट केला पाहिजे. त्यातून एकात्मता वाढत राहील. देश, पुढील पिढी बळकट होईल,’ असे ते म्हणाले.

पुरस्कार म्हणजे पुरातत्त्वशास्त्राचा सन्मान : डॉ. देगलूरकर
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वादच मानतो. हा पुरस्कार म्हणजे पुरातत्त्वशास्त्राचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सर्वांत प्राचीन आणि समृद्ध आहे. ती सर्वांत प्रवाही आहे. या संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचे काम पुरातत्त्वशास्त्र करते.’

‘मराठवाड्यातून आलेल्या माझ्यासारख्याला पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराचे कार्यक्षेत्र वाढल्याचा आनंद आहे. ज्ञानाची मशागत व्यासंगाने करीत राहिले पाहिजे. नवा इतिहास, प्राचीन गोष्टी पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘मातीत जन्मती, मातीत मरशी’ या उक्तीला जोडून ‘मातीत उत्खननास जुळशी’  अशी ओळ मला जोडावीशी वाटते. भारतीय संस्कृतीत मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्राला महत्त्व असते. मंदिर ही सामाजिक व्यवस्था आहे. ही संस्कृती अक्षय्य राहण्यात मूर्तिशास्त्राचे महत्त्वाचे योगदान आहे,’ असे डॉ. देगलूरकर म्हणाले.

या कार्यक्रमात वीरमाता लता नायर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहंमद चांद शेख, सीमेवर लढताना जखमी झालेले सैनिक नाईक फुलसिंग, हवालदार गोविंद बिरादार, हवालदार प्रमोद सपकाळ यांचाही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ गो. बं. देगलूरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफीतही दाखविण्यात आली. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी केले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रभा अत्रे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, पुण्यात पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीनंतरही पुणेकर मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.

(पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली डॉ. देगलूरकर यांची विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. गो. बं. देगलूरकर यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZRHCE
Similar Posts
ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान पुणे : पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १० वाजता होणाऱ्या शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे
‘नव्या पिढीने पुरातत्त्व व मूर्तिशास्त्र संशोधनाचे काम पुढे न्यावे’ पुणे : ‘मी पुण्यात शिकायला जाण्यापूर्वी आईने बजावले होते, की पुणे हे पंडित व विद्वानांचे गाव आहे. तू किमान त्यांच्या पायाशी बसायची योग्यता निर्माण कर. आज या पुणेकरांनीच मला गौरवून अशाच विद्वानांच्या रांगेत बसवले आहे,’ अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो
डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर पुणे : ‘पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे,’ अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली
‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ आरत्यांमध्ये हमखास चुकीच्या म्हटल्या जाणाऱ्या शब्दांवर कोटी करणारे संदेश हल्ली सोशल मीडियावर फिरत असलेले दिसतात. अशाच काही संदेशांवरूनच पुण्यातील सायली दामले यांना एक भन्नाट कल्पना सुचली. प्रबोधनाचा उद्देश ठेवून त्यांनी या चुकीच्या शब्दांना गंमतशीर चित्रांमध्ये उतरवलं. ‘उच्चारण’ या नावाने सुरू केलेली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language